उच्चस्तरीय चौकशी, कथित आर्थिक अनियमिततेचा तपास आणि दोषींवर फौजदारी कारवाईचीही जोरदार मागणी.
पिंपरी : मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी आता कारवाईची मागणी अधिक तीव्र झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत लोंढे यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना निवेदन देत आरोग्य विभागातील आरोग्य निरीक्षक सुशील मलये यांना तात्काळ निलंबित करून संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.
चंद्रकांत लोंढे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मोशी कचरा डेपो येथे झालेल्या भीषण दुर्घटनेत अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ही घटना केवळ अपघात नसून संबंधित विभागातील निष्काळजीपणा, प्रशासकीय हलगर्जीपणा आणि व्यवस्थापनातील गंभीर त्रुटींचा परिणाम असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत लोंढे यांनी आपल्या निवेदनात कचरा डेपोचे व्यवस्थापन, कचऱ्याची उंची, पर्यावरणीय नियमांचे पालन, सुरक्षा उपाययोजना, यापूर्वी देण्यात आलेल्या नोटिसा आणि त्यावरील कारवाई यांची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.
यासोबतच, आरोग्य निरीक्षक सुशील मलये यांच्या संपूर्ण कार्यकाळातील निर्णयप्रक्रिया, आर्थिक व्यवहार, मालमत्ता तसेच कचरा वाहतूक, विल्हेवाट आणि कंत्राटी प्रक्रियेमध्ये कथित अनियमितता झाल्या आहेत का, याची सक्षम तपास यंत्रणेमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही चंद्रकांत लोंढे यांनी केली आहे.
निवेदनात पुढे असेही नमूद करण्यात आले आहे की, चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांना तात्पुरते निलंबित करण्यात यावे. दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर फौजदारी कारवाई करण्यात यावी. तसेच भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी मोशी कचरा डेपोचे तातडीने सेफ्टी ऑडिट करून सर्व सुरक्षा उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी.
राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत लोंढे यांच्या या मागणीमुळे मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी पुन्हा एकदा महापालिका प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, आयुक्त या निवेदनावर कोणती भूमिका घेतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
