चिंचवड – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विद्युत विभागामार्फत राहाटणी येथील व्यंगस्कर अॅकेडमीमध्ये सुमारे ८.५ कोटी रुपयांचा खर्च करून करण्यात आलेल्या विविध विद्युत कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. सामाजिक कार्यकर्ते रमेश वाघेरे यांनी महानगरपालिकेकडे तक्रार अर्ज दाखल करून या प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती.त्याच तक्रारीच्या अनुषंगाने सामाजिक कार्यकर्ते ज्ञानदेव काकडे यांनी आता संजय खाबडे यांची ग्रॅज्युटी फंड व पेन्शन थांबवण्याची मागणी आयुक्त यांच्या कडे ईमेल द्वारे केली आहे.
तक्रारीनुसार, या कामांच्या अनियमिततेत विद्युत विभागाचे अधिकारी संजय खाबडे यांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. हे काम संजय खाबडे यांच्या कार्यकाळातच पूर्ण झाले आहे. संजय खाबडे हे ३० जून २०२५ रोजी महानगरपालिकेच्या सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत.
तक्रारदाराने आपल्या निवेदनात स्पष्टपणे नमूद केले आहे की, संजय खाबडे यांच्याविरोधात चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना कोणत्याही प्रकारची ग्रॅज्युटी किंवा पेन्शन वितरीत करण्यात येऊ नये. तसेच, महापालिकेच्या निधीचा गैरवापर झाल्यास दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
तसेच, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी स्वतंत्र समिती नेमावी व अहवाल सार्वजनिक करावा, अन्यथा उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही दिला आहे. सदर तक्रारीची एक प्रत मुख्य लेखा व वित्त अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांना पाठवण्यात आली आहे.
या प्रकरणामुळे महापालिकेच्या प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेला सुरुवात झाली आहे. प्रशासनाने या तक्रारीची गंभीर दखल घेऊन तत्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.
