Spread the love

चाकण | सेंट अँन्स स्नेह भवन सामाजिक संस्था व ग्रामपंचायत खराबवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने चाकण (खराबवाडी) येथे कायदेविषयक कामगार मार्गदर्शन व जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात कामगारांना त्यांच्या हक्कांविषयी, शासकीय योजनांविषयी तसेच विविध कायदेशीर बाबींविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमास सरकारी कामगार अधिकारी, खेड (पुणे) मा. दीपक गोटके प्रमुख उपस्थित होते. त्यांनी असंघटित व इतर कामगारांसाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजना, त्यांचा लाभ घेण्याची प्रक्रिया तसेच शासनाच्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.

यावेळी प्रमुख वक्ते व मार्गदर्शक ॲड. मंगेश खराबे यांनी कामगारांचे संविधानिक व कायदेशीर हक्क, श्रमकायद्यांतील महत्त्वाच्या तरतुदी, अन्यायग्रस्त, पीडित व दुर्बल कामगारांना उपलब्ध असलेले कायदेशीर संरक्षण, न्याय मिळविण्याचे मार्ग तसेच कायद्याविषयी जनजागृतीचे महत्त्व याविषयी सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी प्रत्येक कामगाराने आपल्या हक्कांची जाणीव ठेवून कायद्याच्या चौकटीत राहून अन्यायाविरुद्ध लढण्याचे आवाहन केले.

शिबिरादरम्यान लाभार्थ्यांना आयुष्मान भारत कार्ड व श्रम कार्ड यांचे मोफत वितरण करण्यात आले. उपस्थित कामगारांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध कायदेशीर प्रश्नांचे निरसन करून घेतले.

कार्यक्रमास माजी सरपंच पांडुरंग बिरदवडे सामाजिक कार्यकर्त्या अलकाताई खेडकर, संदीप घाडगे,पूनम वाघमारे, शर्मिलाताई भालेराव तसेच स्नेहभोवन सामाजिक संस्थेच्या संचालिका यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत मोरे यांनी केले, तर ज्ञानेश्वर शेळके यांनी आभार प्रदर्शन केले. कामगारांमध्ये कायदेशीर जागरूकता निर्माण करून त्यांना त्यांच्या हक्कांबाबत सक्षम करण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिराचे उपस्थितांकडून विशेष कौतुक करण्यात आले. समाजातील दुर्बल व असंघटित कामगारांपर्यंत कायद्याची माहिती पोहोचविण्यासाठी अशा जनजागृती शिबिरांची आवश्यकता असून, भविष्यातही अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version