पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहर पुन्हा एकदा बेकायदेशीर स्पा सेंटरच्या विळख्यात सापडले आहे. काही महिन्यांपूर्वी पोलीस आयुक्तांनी केलेल्या धडक कारवाईनंतर बंद झालेली स्पा सेंटर पुन्हा नव्या जोमाने सुरू झाली असून, यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, सामाजिक न्याय विभागाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत लोंढे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी थेट मा. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री, पोलीस महासंचालक आणि पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली असून, शहरातील 50 हून अधिक संशयास्पद स्पा सेंटरची यादी सोबत जोडली आहे.
तक्रारीत काय म्हटलंय?
लोंढे यांनी आपल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की, वाकड, हिंजवडी, बावधन, कळेवाडी, सांगवी, निगडी आणि भोसरी MIDC या भागात रिवा, डॉल्फिन, फ्लोरा, लोटस, गोल्डन, आयकॉन, रेडियन्स, लिया, नायरा यांसारखे अनेक स्पा बेकायदेशीररित्या सुरू आहेत.
विशेषतः हिंजवडी IT पार्क परिसरात देश-विदेशातील हजारो तरुण-तरुणी वास्तव्यास असून, तिथे 24 तास हॉटेल, पब आणि स्पा सेंटर सुरू असल्याने मानवी तस्करी आणि देहविक्री सारखे प्रकार वाढण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
यासोबतच त्यांनी चाकण, आळंदी, म्हाळुंगे परिसरातील मटका, ऑनलाईन क्रिकेट सट्टा आणि लॉजमधील वेश्याव्यवसायावरही कायमस्वरूपी कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या तक्रारीनंतर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आमचा चांगल्या वेलनेस सेंटरला विरोध नाही, पण मसाजच्या नावाखाली जर देहविक्री आणि सोशल मीडियावर अश्लील जाहिराती देऊन तरुणाईला बिघडवण्याचे काम होत असेल, तर ते खपवून घेतले जाणार नाही. पोलीस आणि महापालिकेची संयुक्त धाड पडली पाहिजे,” अशी मागणी चंद्रकांत लोंढे यांनी केली आहे.
चंद्रकांत लोंढे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र

