माहिती अधिकार कार्यकर्ते रमेश वाघेरे यांचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना निवेदन, क्रिसल इलाईट एलएलपी कंपनीवर फसवणुकीचा आरोप
पिंपरी-चिंचवड (दि. १० ऑक्टोबर): चिंचवडगाव, वेताळनगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन (SRA) प्रकल्पात जादा चटई निर्देशांक (TDR) लाटण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते रमेश नानासाहेब वाघेरे यांनी याबाबत महापालिका आयुक्त मा. डॉ. विजय सूर्यवंशी यांना दिनांक ९/१०/२०२६ रोजी निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, वेताळनगर, चिंचवडगाव येथील SRA प्रकल्प क्रिसल इलाईट एल.एल.पी या कंपनीस देण्यात आला आहे. या झोपडपट्टीच्या मूळ सदृश्य अहवालात १३१३ इतकी घरे होती.
यापैकी महानगरपालिकेने BSUP अंतर्गत १००८ घरांचे वाटप व २४ दुकानांचे वाटप आधीच केले आहे. त्यामुळे आता प्रत्यक्षात फक्त ३०५ घरांचे वाटप करणे शिल्लक आहे.
४७५ घरांचा जादा TDR मागितल्याचा आरोप
आता फक्त ३०५ घरांचे वाटप राहिले असताना, सदर कंपनीचे मालक सागर अगरवाल यांनी ४७५ घरांचे हस्तांतर बाकी असल्याचे दाखवून सदरच्या जादा घरांचा चटई निर्देशांक (TDR) मागितला आहे, असा आरोप वाघेरे यांनी केला आहे.
ही बाब अत्यंत गंभीर असून ही शासनाची आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची फसवणूक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
वेताळनगर SRA प्रकल्पाची उच्चस्तरीय चौकशी होणे आवश्यक असून, संबंधित कंपनीने जादा TDR मिळविण्यासाठी सुरू केलेली प्रक्रिया त्वरित थांबवावी, अशी मागणी रमेश वाघेरे यांनी केली आहे.
डिस्क्लेमर: सदर बातमी ही श्री. रमेश वाघेरे यांनी दिलेल्या निवेदनावर आधारित असून, त्यातील आरोप हे निवेदनात नमूद केल्याप्रमाणे आहेत. याबाबत क्रिसल इलाईट एल.एल.पी कंपनी आणि PCMC प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया / खुलासा प्राप्त होताच प्रसिद्ध करण्यात येईल.

