पिंपरी (दि. ०६ नोव्हेंबर २०२४) :- चिखलीतील इम्पिरीअल रुग्णालयात पायाजवळ वॉर्मर मशीन ठेवल्याने गुडघ्याखालील पाय जळल्याने दोन वर्षाच्या बाळाचा मृत्यू झाला होता. हि घटना १८ नोव्हेंबर २०२३ रोजी घडली होती. ससून रुग्णालयातील समितीच्या अहवालात उपचारात हलगर्जीपणा झाल्याचे निष्पन्न झाल्याने तीन डॉक्टरांसह दोन परिचारिकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिरांश रमाकांत गादेवार (वय २) असे मृत्यूमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत त्याची आई दीपाली गादेवार (वय ३६, रा. नेवाळेवस्ती, चिखली) यांनी मंगळवारी (दि. ५) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी डॉ. जितेश मदनसिं दाभोळ, डॉ. रजनिश जगदंबाप्रसाद मिश्रा, डॉ. रोहन प्राणहंस माळी, परिचारिका रेचल अनिल दिवे, सविता नंदकिशोर वरवटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी दीपाली यांच्या मुलाला सर्दी झाल्याने त्यास डॉ. दाभोळ यांच्या सल्ल्यानुसार नेवाळेवस्ती, चिखली येथील इम्पिरीअल रुग्णालयात दाखल केले होते. बाळाचे सॅम्पल घेण्यासाठी डॉक्टर आले. त्यांनी दिरांश याच्या आईला बाहेर थांबण्यास सांगितले. त्यानंतर सकाळी आठ वाजताच्या सुमारास दीपाली या पुन्हा मुलाजवळ आल्यानंतर बाळाच्या पायाजवळ ठेवलेल्या वार्मर मशीनमुळे बाळाचा गुडघ्याखाली पाय पूर्णपणे जळाला असल्याचे त्यांना दिसले होते.
दवाखान्याच्या निष्काळजीपणामुळे एका लहान मुलाचा मृत्यू झाला. मयत मुलाच्या मातेने न्यायासाठी धडपड केली. त्या मातेच्या दोन वर्षाच्या अथक प्रयत्नाला अखेर यश आले. आज दोन वर्षानंतर घटनेला जबाबदार रुग्णालयातील डॉक्टरांसह परिचारिकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी शहरातील सर्वच रूग्णालयांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
– मा. अमित गोरखे, आमदार विधानपरिषद…

