पिंपरी (प्रतिनिधी) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘फ’ प्रभाग कार्यालयाच्या हद्दीतील शाहूनगर, संभाजीनगर व पूर्णानगर परिसरात मोठ्या प्रमाणावर उभारण्यात आलेल्या अनधिकृत पत्रा शेड व व्यावसायिक गाळ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत महादेव लोंढे यांनी महानगरपालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या संदर्भात दि. ९ ऑक्टोबर २०२५ रोजी महानगरपालिकेकडे लेखी तक्रार अर्ज सादर करण्यात आला होता. मात्र चार ते पाच महिने उलटूनही संबंधित अनधिकृत बांधकामांवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान ‘फ’ प्रभाग कार्यालयाकडून संबंधित सोसायटींना दि. ५ फेब्रुवारी आणि १० फेब्रुवारी २०२६ रोजी नोटिसा देण्यात आल्या. मात्र केवळ नोटीस देण्यापलीकडे कोणतीही कारवाई झालेली नसून अनधिकृत पत्रा शेड व व्यावसायिक गाळे आजही अस्तित्वात असल्याचे लोंढे यांनी नमूद केले आहे.
या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून संबंधित बिटनिरीक्षक व प्रभागातील अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष अथवा संगनमत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
📌 अधिकाऱ्यांवर निलंबनाची मागणी
या प्रकरणात शाहूनगर, संभाजीनगर व पूर्णानगर परिसरातील सर्व अनधिकृत पत्रा शेड व व्यावसायिक गाळ्यांवर तात्काळ तोडकामाची कारवाई करण्यात यावी. तसेच कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित बिटनिरीक्षक व जबाबदार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
📌 चौकशी करून कारवाईची मागणी
दि. ९ ऑक्टोबर २०२५ पासून आजपर्यंत या प्रकरणात प्रत्यक्ष कारवाई का झाली नाही याची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी. चौकशीत दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
⚠️ आंदोलनाचा इशारा
या प्रकरणात महानगरपालिका प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास नागरिकांच्या वतीने तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देखील निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

