पिंपरी, दि. १४ ऑगस्ट : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील नेवाळे वस्ती येथील कसा रिओ सोसायटीसमोरील रस्त्यावर गेल्या महिनाभरापासून स्ट्रॉम वॉटर लाईनचे काम सुरू आहे. मात्र, काम अत्यंत संथगतीने सुरू असल्याने परिसरातील नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. रस्ता खोदून ठेवण्यात आला असून अद्याप तो पूर्ववत करण्यात आलेला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
स्ट्रॉम वॉटर लाईनच्या कामासाठी रस्ता खोदण्यात आल्यानंतर संबंधित ठेकेदाराकडून काम पूर्ण करण्यास विलंब होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. विशेष म्हणजे, गेल्या एक महिन्यापासून हा प्रश्न कायम असतानाही अद्याप ठोस उपाययोजना झालेली नाही. ज्या ठिकाणी काम करण्यात आले आहे, तेथील कामाचा दर्जाही निकृष्ट असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
रस्ता खोदून ठेवल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून दुचाकीस्वार, पादचारी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे. या ठिकाणी आतापर्यंत अनेक किरकोळ अपघात घडल्याचे नागरिकांचे म्हणणे असून, वेळीच उपाययोजना न झाल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या गंभीर समस्येबाबत संबंधित फ क्षेत्रीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा नागरिकांनी प्रयत्न केला असता अधिकारी ‘नॉट रिचेबल’ असल्याची तक्रार समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये अधिकच संताप व्यक्त होत आहे. अधिकारी नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही करण्यात येत आहे.
ठेकेदाराला पाठीशी घालण्याचे काम क्षेत्रीय अधिकारी करत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. मात्र, या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नाही. संबंधित प्रशासनाने याबाबत तातडीने खुलासा करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. महापालिका प्रशासनाने या रस्त्याची तातडीने पाहणी करून स्ट्रॉम वॉटर लाईनचे काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावे, खोदलेला रस्ता त्वरित पूर्ववत करावा आणि कामात हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
तसेच, कामाच्या दर्जाची तपासणी करून दोष आढळल्यास संबंधित अधिकारी व ठेकेदाराची जबाबदारी निश्चित करावी. अन्यथा नागरिकांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही परिसरातील नागरिकांकडून देण्यात येत आहे.

