२५ वर्षांच्या निष्ठावंत शिवसैनिकावर भोसरी विधानसभा प्रमुखपदाची जबाबदारी; अनिल सोमवंशी यांचा निर्धार
भोसरी : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या भोसरी विधानसभा प्रमुखपदी श्री. अनिल पाराजी सोमवंशी यांची शिवसेना मुंबई मद्यावर्ती कार्यलय येथून नियुक्ती करण्यात आली आहे.
अनिल सोमवंशी हे गेल्या २५ वर्षांपासून शिवसेनेचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहेत. पक्षाच्या विविध पदांवर त्यांनी जबाबदारी सांभाळली असून, सातत्याने नागरिकांच्या संपर्कात राहून सामाजिक आणि जनहिताचे विविध उपक्रम राबविले आहेत.
भोसरी विधानसभा मतदारसंघातील स्थानिक प्रश्नांची जाण असलेले तसेच समाजातील विविध घटकांशी सातत्याने संपर्क ठेवणारे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे.
नियुक्तीनंतर बोलताना अनिल सोमवंशी यांनी भोसरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कारभारातील प्रश्नांवर आवाज उठवून नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी काम केले जाईल, असे त्यांनी सांगितले.
नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवून त्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करणे, जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देणे आणि पक्षाची संघटना अधिक मजबूत करणे, हे आपले प्रमुख उद्दिष्ट असल्याचेही सोमवंशी यांनी स्पष्ट केले.
या नियुक्तीनंतर भोसरी विधानसभा मतदारसंघात पक्षाच्या संघटनात्मक कामाला अधिक बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

