१ ते ७ ऑगस्टदरम्यान कार्यक्रमांचा थाट; कलाकार, व्याख्याते अन् प्रबोधनकार मानधनाच्या प्रतीक्षेत — महापालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
पिंपरी-चिंचवड : प्रतिनिधी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने १ ऑगस्ट ते ७ ऑगस्टदरम्यान ‘अण्णाभाऊ साठे जयंती विचार प्रबोधन पर्व’ मोठ्या उत्साहात पार पडले. या सात दिवसांच्या कालावधीत विविध सांस्कृतिक, सामाजिक, प्रबोधनात्मक आणि वैचारिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
मात्र, ज्या लोककलावंतांनी, व्याख्यात्यांनी, प्रबोधनकारांनी आणि विविध कार्यक्रमांमध्ये योगदान देणाऱ्या व्यक्तींनी आपली कला व सेवा देत कार्यक्रम यशस्वी केला, त्यांनाच आता मानधनासाठी महापालिकेच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत असल्याची बाब समोर येत आहे.
कार्यक्रम पार पडूनही संबंधित कलाकार व मानधनधारकांची देयके अद्याप अदा झालेली नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कार्यक्रमांचे आयोजन करण्यापूर्वी त्यासाठी निधी, प्रशासकीय मान्यता, खर्चाचे नियोजन आणि संबंधित मानधनाची तरतूद केली जाते. मग कार्यक्रम संपल्यानंतर मानधनाची देयके रखडण्याचे नेमके कारण काय, असा सवाल उपस्थित होत आहे.
कार्यक्रमासाठी कोट्यवधींची किंवा लाखोंची तरतूद करण्याची तयारी; मात्र ज्यांनी प्रत्यक्ष कार्यक्रम सादर केले त्यांच्या मानधनासाठी विलंब का?असा प्रश्न आता संबंधित कलाकार आणि प्रबोधनकारांकडून उपस्थित केला जात आहे.
महापालिका प्रशासनाकडून विविध कार्यक्रमांसाठी मंडप, स्टेज, ध्वनी व्यवस्था, विद्युत व्यवस्था, प्रसिद्धी, सजावट आणि इतर बाबींवर खर्च केला जातो. मात्र कार्यक्रम सादर करणाऱ्या लोककलावंतांचे मानधन वेळेत अदा होत नसेल, तर ही प्रशासनाच्या आर्थिक नियोजनाची आणि कार्यपद्धतीची गंभीर बाब मानली जात आहे.
विशेष म्हणजे, अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य आणि शाहिरीच्या माध्यमातून वंचित, कष्टकरी आणि सामान्य माणसाचा आवाज बुलंद केला. त्यांच्याच जयंतीनिमित्त आयोजित प्रबोधन पर्वात सहभागी झालेल्या कलाकारांना त्यांच्या मेहनतीचे मानधन मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत असेल, तर ही निश्चितच गंभीर आणि प्रशासनाने आत्मपरीक्षण करण्याची बाब आहे.
मानधनाच्या विलंबामागे नेमकी प्रशासकीय प्रक्रिया रखडली आहे की संबंधित विभागाकडून देयके तयार करण्यात दिरंगाई झाली आहे? कार्यक्रमांसाठी मानधनाची रक्कम पूर्वनियोजित होती का? संबंधित कलाकारांची बिले सादर झाली आहेत का? बिले सादर झाली असल्यास ती कोणत्या टप्प्यावर प्रलंबित आहेत? आणि मानधन नेमके कधी अदा होणार?
या सर्व प्रश्नांची उत्तरे महापालिका प्रशासनाने स्पष्टपणे देण्याची गरज आहे.
कार्यक्रम संपला, टाळ्यांचा कडकडाट झाला; पण कलाकारांच्या हातात मानधन कधी येणार? हा प्रश्न आता केवळ संबंधित कलाकारांचा नसून महापालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करणारा ठरत आहे.
त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित विभागाकडून माहिती मागवावी, प्रलंबित मानधनाची कारणे स्पष्ट करावीत आणि पात्र लोककलावंत, व्याख्याते व प्रबोधनकारांचे मानधन तातडीने अदा करण्याबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.
आता पाहायचे हेच—अण्णाभाऊंच्या नावाने प्रबोधनाचा गजर करणारे प्रशासन, त्यांच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या कलाकारांच्या मानधनाच्या प्रश्नावर कधी जागे होणार?

