मोशी | गायत्री इंग्लिश मीडियम स्कूल, मोशी येथे यंदाचा गणेशोत्सव ‘ग्रंथसंपदा’ या आगळ्यावेगळ्या आणि ज्ञानवर्धक संकल्पनेवर आधारित उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात येतोय. गणेशोत्सवाच्या पारंपरिक भक्तीला ज्ञान, संस्कार आणि वाचनसंस्कृतीची जोड देत शाळेने विद्यार्थ्यांसह पालक आणि समाजाला एक प्रेरणादायी सामाजिक संदेश दिला. स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. विनायक भोंगाळे यांच्या मते ‘ग्रंथसंपदा’ ही केवळ पुस्तकांची संग्रहित संपत्ती नसून, ती समाजाच्या बौद्धिक, सांस्कृतिक आणि नैतिक विकासाचा अमूल्य ठेवा आहे. पुस्तके माणसाला विचार करायला शिकवतात, ज्ञानाची क्षितिजे विस्तारतात आणि जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन विकसित करतात. याच विचारांना केंद्रस्थानी ठेवून शाळेने गणेशोत्सवाची सजावट, मांडणी आणि संकल्पना साकारली.
या ज्ञानमय आणि भक्तिमय सोहळ्यास संस्थेचे अध्यक्ष श्री. विनायक भोंगाळे, नगरसेविका कविताताई भोंगाळे पाटील, खजिनदार सौ. विजया भोंगाळे, विश्वस्त सौ. सरिता विखे पाटील, योगेश एंटरप्राइजेसचे व्यवस्थापकीय संचालक श्री. योगेश भोंगाळे, विपणन अधिकारी श्री. शैलेंद्र सिंग तसेच शाळेचे सर्व पालक प्रतिनिधी आणि पालकवर्ग उपस्थित होते.
मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाचे वातावरण अधिक प्रसन्न, उत्साहपूर्ण आणि मंत्रमुग्ध करणारे झाले. गणरायाच्या भक्तीबरोबरच ज्ञान, संस्कार आणि वाचनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.

