पिंपरी-चिंचवड : प्रतिनिधी
चिंचवड | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका ब क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील बिजलीनगर परिसरात, शिवनगरी गणेश मंदिराच्या पाठीमागे सुरू असलेल्या एका बांधकामाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. हे बांधकाम अधिकृत आहे की अनधिकृत, याबाबत अद्याप स्पष्टता नसताना संबंधित महापालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
विशेष म्हणजे, हे बांधकाम हायव्होल्टेज टॉवर आणि उच्चदाबाच्या विद्युत तारांच्या खाली सुरू असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
या बांधकामाबाबत ब क्षेत्रीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, संबंधित बिटनिरीक्षकांकडून माहिती घेण्यास सांगितल्याचे सांगण्यात आले. मात्र, यामुळे आणखी एक प्रश्न उपस्थित होतो—महापालिकेच्या संबंधित बिटनिरीक्षकांच्या नियमित पाहणीदरम्यान हे बांधकाम त्यांच्या निदर्शनास आले नव्हते का? आले असेल तर संबंधित बांधकामाला नोटीस बजावण्यात आली आहे का? आणि नोटीस बजावली असेल, तर त्यानंतरही बांधकाम सुरू कसे आहे?
महापालिका प्रशासनाकडून अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी वेळोवेळी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जातात. मात्र, बांधकाम सुरू असतानाच त्यावर प्रभावी कारवाई झाली, तर पुढे मोठे अनधिकृत बांधकाम उभे राहण्याचा प्रश्नच निर्माण होणार नाही.
काही दिवसांपूर्वी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे पिंपरी-चिंचवडमध्ये आले असता शहरातील अनधिकृत बांधकामांबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. अनधिकृत बांधकाम करणाऱ्या बिल्डरांवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले होते.
त्यामुळे बिजलीनगरमधील या बांधकामाबाबत महापालिका प्रशासन आता नेमकी काय भूमिका घेणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे. संबंधित बांधकामाची अधिकृतता तपासून, नियमांचे उल्लंघन आढळल्यास तातडीने कारवाई केली जाणार का? तसेच बांधकाम सुरू असताना त्याकडे दुर्लक्ष झाले असल्यास संबंधित बिटनिरीक्षक आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई केली जाणार का?
अनधिकृत बांधकाम सुरू होण्यापूर्वीच ते रोखण्याची जबाबदारी असताना, कारवाईसाठी आणखी किती वेळ वाट पाहणार? असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

