पुणे | १२ ऑगस्ट : मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम, नेहरूनगर-पिंपरी येथे सुरू असलेल्या १६व्या हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत हॉकी राजस्थान, हॉकी जम्मू-काश्मीर आणि हॉकी उत्तराखंड यांनी अनुक्रमे डिव्हिजन ‘सी’ आणि ‘बी’मध्ये आपल्या गटातील सामन्यांत दमदार कामगिरी करत विजयी सलामी दिली.
या स्पर्धेचे आयोजन हॉकी महाराष्ट्र आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया हे स्पर्धेचे प्रेझेंटिंग स्पॉन्सर असून, युनियन बँक ऑफ इंडिया पॉवरिंग पार्टनर आहे. एमक्युअर फार्मास्युटिकल्स अधिकृत भागीदार, बिसलेरी हायड्रेशन पार्टनर, तर असवानी असोसिएट्स आणि सुहाना मसाला सपोर्ट पार्टनर्स आहेत.
स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी डिव्हिजन ‘बी’ आणि ‘सी’मधील सामन्यांत खेळाडूंनी आक्रमक, वेगवान आणि दर्जेदार हॉकीचे प्रदर्शन केले.
डिव्हिजन ‘सी’ : राजस्थानचा दणदणीत विजय
डिव्हिजन ‘सी’च्या पूल ‘ए’मध्ये हॉकी राजस्थानने दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव हॉकी संघाचा ७-३ असा पराभव करत विजयी सुरुवात केली. मध्यंतराला राजस्थानने ३-१ अशी आघाडी घेतली होती. दुसऱ्या सत्रातही त्यांनी आक्रमक खेळ कायम ठेवत आणखी चार गोल नोंदवले.
महावर गायत्रीने १८व्या आणि ५८व्या मिनिटाला दोन गोल केले. रुची गुप्ताने २२व्या आणि ४७व्या मिनिटाला गोल करत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. कन्वर पुष्पाने २२व्या आणि ४२व्या मिनिटाला गोल केले, तर लामोरिया सॅलिनीने ३७व्या मिनिटाला गोल नोंदवला.
दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव संघाकडून नंदिनीबेन नंदुभाई दुलसाडा, रश्मी रायकर आणि अंजली यांनी प्रत्येकी एक गोल केला.
जम्मू-काश्मीरची गुजरातवर मात
डिव्हिजन ‘सी’च्या पूल ‘बी’मध्ये हॉकी जम्मू-काश्मीरने हॉकी गुजरातचा ४-१ असा पराभव केला.
सोनाली देवीने सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला गोल करत जम्मू-काश्मीरला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर २७व्या मिनिटाला समिना अख्तरने आघाडी दुप्पट केली. किरण बिहारीने ३८व्या आणि ५४व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करत जम्मू-काश्मीरचा विजय निश्चित केला.
गुजरातकडून जानवी बारईने ५१व्या मिनिटाला एकमेव गोल केला. मध्यंतराला जम्मू-काश्मीरकडे २-० अशी आघाडी होती.
आंध्र प्रदेशचा केरळवर रोमांचक विजय
डिव्हिजन ‘बी’च्या पूल ‘ए’मध्ये हॉकी आंध्र प्रदेशने केरळ हॉकीचा ३-२ असा पराभव करत रोमांचक विजय मिळवला.
श्रीविद्या थिरुमलासेट्टीने सातव्या मिनिटाला गोल करत आंध्र प्रदेशचे खाते उघडले. केरळकडून ज्योती क्साक्साने २६व्या मिनिटाला गोल करत बरोबरी साधली.
श्रीविद्याने ४०व्या मिनिटाला पुन्हा गोल करत आंध्र प्रदेशला आघाडी मिळवून दिली. पूजारी मधुरिमा बाईने ५०व्या मिनिटाला तिसरा गोल केला. त्याच मिनिटाला केरळकडून अभय ज्योती ए. एस. हिने गोल करत आघाडी कमी केली; मात्र आंध्र प्रदेशने अखेरपर्यंत आघाडी कायम ठेवत सामना जिंकला.
मिझोरामचा आसामवर दणदणीत विजय
याच पूलमध्ये हॉकी मिझोरामने आसाम हॉकीचा ६-२ असा पराभव करत प्रभावी विजय नोंदवला. मध्यंतराला मिझोरामकडे २-१ अशी आघाडी होती.
झोथानमावीने ३३व्या, ५२व्या आणि ५५व्या मिनिटाला गोल करत शानदार हॅट्ट्रिक नोंदवली. लालत्लानचुंगी, लॉईसी लालतनपुई आणि अंजना क्साक्सा यांनी प्रत्येकी एक गोल केला. आसामकडून सुनीता रोमानीने २१व्या आणि ४०व्या मिनिटाला दोन गोल केले.
उत्तराखंडचा गोअन्स हॉकीवर एकतर्फी विजय
डिव्हिजन ‘बी’च्या पूल ‘बी’मध्ये हॉकी उत्तराखंडने गोअन्स हॉकीवर ५-० असा एकतर्फी विजय मिळवला.
रईन केहकाशा अली आणि आरती यांनी पहिल्या सत्रात प्रत्येकी एक गोल करत उत्तराखंडला मध्यंतराला २-० अशी आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात दीक्षाने ४२व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. त्यानंतर रईन केहकाशा अलीने ४६व्या, तर आरतीने ५०व्या मिनिटाला आपापला दुसरा गोल नोंदवत उत्तराखंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
ही स्पर्धा भारतातील उदयोन्मुख कनिष्ठ महिला हॉकीपटूंना राष्ट्रीय स्तरावर आपले कौशल्य, जिद्द, आत्मविश्वास आणि सांघिक भावना सिद्ध करण्यासाठी महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे.
उद्घाटनप्रसंगी मान्यवरांची उपस्थिती
उद्घाटनप्रसंगी श्री. रवी लांडगे – महापौर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका; श्री. नीरज कंसल – मुख्य आयुक्त, जीएसटी व कस्टम्स, पुणे; डॉ. विजय सूर्यवंशी (IAS) – आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका; श्री. कृष्ण प्रकाश, IPS – अतिरिक्त पोलीस महासंचालक, महाराष्ट्र पोलीस व अध्यक्ष, हॉकी महाराष्ट्र; श्री. कैलास कुटे – अध्यक्ष, क्रीडा समिती, पिंपरी चिंचवड महानगरपालिका; श्री. मनोज कुमार टाक – डी जि एम & सी डी ओ, भारतीय स्टेट बँक, महाराष्ट्र सर्कल; श्री. समीक बिस्वास – भारतीय स्टेट बँक; श्री पंकज पाटील – उप आयुक्त, क्रीडा समिती – पिंपरी चिंचवड महानगरपालिका, श्री. मनीष आनंद – महासचिव, हॉकी महाराष्ट्र; विक्रम पिल्ले – ऑलिंपियन; श्री. मनोज भोरे – आयोजन सचिव, वरिष्ठ उपाध्यक्ष, हॉकी महाराष्ट्र तसेच असोसिएट उपाध्यक्ष, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन आदी मान्यवर उपस्थित होते.

